आठवणी …यादे …मेमोरीज…

आठवणी …यादे …मेमोरीज…

काही घटना तुम्ही कधीच विसरू शकत नाही.कन्याकुमारी मी कधीच विसरणार नाही. २८ वर्ष झाली तरीही …आजही माझ्या स्वप्नात ३ समुद्रांच ते ३ रंगी पाणी खळाळत.त्या सागरा पेक्षा अथांग व्यक्तिमत्व असलेले विवेकानंद डोळ्या समोर येतात आणि मी “जागा” होतो.

मला आठवत एक प्रेत. एका व्यक्तीच ..जिच्याशी मी काल पर्यंत खेळलो होतो. का वाटलं तिला संपवाव आपलं आयुष्य?यश आणि अपयश येवढ मोठ असतं की कोणाला तरी तिरस्कार वाटावा आपल्या तारुण्याचा? २९ वर्ष झाली असतील ..पण कित्येक वर्ष बघितलय मी ..पांढऱ्या कपड्यात लपेटलेल एक प्रश्न चिन्ह

मला आठवते ती अयोध्या.भकास उदासवाणी कलंकित. एक साधू मात्र धडपडत होता एका राष्ट्रपुरुषाच्या मुक्ती साठी.डोळ्यात अश्रू आणून बोलला …भारत देशाचं हिंदुंच पौरुषत्व कुलुपबंद आहे इथे.तो साधू आज नाही. राष्ट्रपुरुष मुक्त आहे. पण पौरुषत्व? त्याचा लिलाव झाला कधीच सत्तेच्या बाजारात. २६ वर्ष झाली असतील

अजून आठवते ती वेडी..”लक्ष्मी” नावाची. २ मजली घराची मालकीण पण एकेका घासासाठी तडफडणारी.पोटाची आग विझत नाही म्हणून तळतळाट देणारी अर्वाच्य शिव्या देणारी.आम्ही फक्त शिव्याच शिकलो तिच्या कडून. तिच्या पोटची आगीची धग कधी जाणवलीच नाही.जाणवेल कशी? आई बापाच्या पंखाच्या उबेत वाढलेलो आम्ही.जास्त नाही १९ वर्ष झाली त्याला

अजून आठवते स्टेफी. पहिल्यांदा पाहिला तेव्हा.नृत्याच्या “स्टेप्स” १५-० ३०-० ४०-० अशाही मोजता येतात हे तेव्हा कळलं. एका चाकू हल्याचा डाग लागला असेल या चंद्राला. पण मी मात्र कुठलाच चंद्र बघितला नाही त्यानंतर मनापासून. स्कर्ट्सची उंची कमी होऊन देखील!!! कारण स्टेफीची उंची त्या कोणालाच गाठता नाही आली.किती वर्ष झाली? नाही सांगता येत..या आठवणीला वय नाही आणि स्टेफीलाही

आणि तो अपघात. अमरावती रोड म्हणायचो आम्ही पण त्या व्यक्तीला मात्र स्वर्गाचा रस्ता दाखवलान. रस्त्यावर पडलेला मेंदू बघितला आणि नशा उतरला बुद्धिमत्तेचा. वेडा होता म्हणतात..आम्ही मात्र शहाणे झालो. कधी मेंदूचा माज केला नाही…कारण बघितलाय त्याला उघडा..विद्रूप रूपात. २५ वर्ष तरी झाली असणार नक्कीच.

आणि आठवतात मित्र. असंख्य अगणित. भरभरून मैत्री करणारे. कोणी अजून गळ्यात गळे घालतात कोणी नाही. पण गळ्याला नख लावणारा मात्र कोणी भेटला नाहीये. एक शल्य मात्र राहिलं. एका अपूर्ण मैत्रीच..”माझं चुकल” हे मान्य करण्याला वाटलेल्या लाजेच.त्या नंतर आम्ही बोललोच नाही एकमेकांशी.मित्रांच्या आडून एकमेकाची खुशाली कळली. पण…१६ वर्ष झाली त्याला पुन्हा कधी “चुकलो” हा शब्द वापरायची लाज वाटली नाही. एका शब्दासाठी इतक गमावयचं नसत येवढा व्यवहार कळतो आजकाल

जावेद मियांदाद नाही विसरणार मी. केवळ या करता नाही की त्यांनी आपलं जो कणा मोडला तो परत एकसंध करायला १ दशक लागलं. पण या करताही की एका लाडक्या व्यक्तीची ती आहे शेवटची आठवण. कोणाला काय न कोणाला काय. कोणाच्या आठवणीत कोणाचे पाय…किती वर्ष झाली हो त्याला ?

आणि आठवतोय सचिन. कारण त्या आधी आठवतो श्रीकांत. तोच तो मोडलेल्या कण्याचा भारतीय के श्रीकांत. शेपूट घातल होतं त्यांनी.पण वेडात वीर दौडला एक आणि पळता भुई थोडी झाली पाक्यांची. नाही मुश्ताक राहिला ना अब्दुल कादिर सगळे गनीम गारद झाले त्या समशेरीच्या तडाख्यात. २१ वर्ष झाली म्हणतात? मला तर काल पहाटे पडलेलं स्वप्न वाटत..खर झालेलं स्वप्न

आठवत एक गाणं.कुठून तरी लांबून ऐकलेलं. हिंदी कळायचं नाही तेव्हा फारसं. पण सूर ओळखू लागलो तेव्हा पासून. नंतर कळलं की लता आहे म्हणून. मला तर लाजच वाटली. येवड्या महान स्वराचा असा एकेरी उल्लेख ऐकून. पण नंतर कळलं.आईला कधी अहो म्हणण शक्य नाही तसच त्या गळ्याच आहे. ही येवढी जवळीक त्या गळ्यानी साधलीय.कस असतं ना कित्येकदा आई पेक्षा माऊशी जास्ती प्रेमळ असते पण आई ती आईच. तसे इतर स्वर असतील सुंदर तुमच्यासाठी पण आमच्यासाठी लताच. २८ वर्ष झाली नक्कीच कारण लता आणि लाटा कन्याकुमारीच्या एकाच वेळची ओळख.

राबर्तो बेनिनी. नालायक माणूस एकदम. “लाईफ इज ब्युटीफुल” असा सांगून पाणी काढल डोळ्यातून.त्याचा तो १० इंची छाती पुढे काढून मृत्यूला सामोरा जाण्याचा अभिनय बघून वाटल..”बाप”रे येवढ कठीण असत बाप होण? व्यसन लावल इंग्रजी सिनेमाचं. १२ वर्ष झाली आता “केस” हाता बाहेर गेली आहे.

अशा अनेक आठवणी.या काही ठळक. बाकीच्या वर काळाचा मुलामा लागलाय. पण मधेच एकाद्या घटनेच्या छन्नीचा घाव बसला की उडतो टवका मुलाम्याचा. आणि भळभळ वाहतात आठवणी

आणि काही आठवणी अगदी अलीकडच्या आणि फार जवळच्य. त्या कोणी विचारू नयेत आणि मी सांगू नयेत.

अशीच आमची…पुरानी जीन्स आणि पुराणचं तूणतूण !!…

बस यादे यादे यादे रेह जाती है …

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s